गंध
कधी कधी, कुणी मनात कधीही न आलेले प्रश्न विचारून जातं आणि उत्तरं शोधणं कठीण होऊन जातं. पण निरुत्तर होणं हेही आपल्याला परवडणारं नसतं. मग अशावेळी आपण काय करतो? विचार न करता उत्तर देतो आणि बऱ्याचदा तेच मनापासून असतं. कुणी काल मला विचारलं तुझे सगळ्यात आवडते पाच गंध कोणते. वास येतो हे मला फक्त नाक चोंदल्यावर त्याच्या अनुपस्थितीनेच जाणवतं. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासाठी कठीणंच. पण मनात आलेली अगदी टॉप ऑफ द माइंड पाच उत्तरं अशी आली. १. पहिल्या पावसानंतर येणारा मृद्गंध २. जंगलामध्ये येतो तो पानं, माती, झाडं आणि एकंदरीतंच निसर्गाचा गंध ३. तान्हुल्या बाळांना येतो तो एक विशेष गंध ४. कोऱ्या करकरीत पुस्तकाला येणारा कोरा करकरीत गंध आणि ५. सुंदर पोरगी बाजूने गेली की अंगावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेला येणारा गंध. पहिले दोन लगेचच आठवले. तिसऱ्याला थोडा विचार करायला लागला, पाचवा आधी आठवला पण त्याला पाचवाच नंबर द्यायचा होता. शोधून शोधून चौथा सापडला. - निलेश