किटाणू
हल्ली काय विकतं? लहानपणापासून मनावर कोरलेली एक ऍड जगतातली बाब आहे. कुठल्याही जाहिरातीत बाई हवी. मग ती जाहिरात टक्कलावर थापून केस उगवण्याच्या तेलाची असो, दाढीच्या साबणाची असो किंवा ट्रकमध्ये टाकायच्या इंजिन ऑइलची असो. पण हल्ली ह्या समजाला छेद देणाऱ्या गोष्टी टी. व्ही वर दिसायला लागल्यात. सुंदर बाईबरोबरच, आपल्या उत्पादनाचा खप भारतात वाढवायचा हुकमाचा एक्का कोणता? जंतू. ज्याला हिंदीमध्ये प्रेमाने किटाणू असं म्हणतात जिथे तिथे, जळी स्थळी, काष्ठी पाषाणी, हगल्या पादल्या कुठल्याही जाहिरातीत लोकांना भीती घालून उत्पादन विकत घ्यायला लावायची हमखास युक्ती म्हणजे हा किटाणू साबण विकतो जंतू, कपडे धुण्याचा साबण विकतो जंतू, फ्रीज विकतो जंतू, पाणी विकतो जंतू. वॉशिंग मशीन विकतो जंतू. अजून काय काय विकत असेल भगवान जाणे. आताशा सुंदर बाई आणि किटाणू ह्यांचं डेडली काँबिनेशन व्हायला लागलंय. सुंदर बाईने गोड हसत हसत भीती घालायची. आमचं प्रॉडक्ट वापरा ना गडे (no pun intended). नाहीतर किटाणू हल्ला करतील. वाचवायचं ना तुला किटाणूपासून? मग घे आमचा टी. व्ही. त्यातून निघणाऱ्या प्रकाशात एकदा का किटाणू आले की ते मरून जातात....