गोष्ट
"एका गावात होतं एक पोष्ट.. संपली माझी गोष्ट" असं आम्ही लहान असताना सांगायचो एकमेकांना.. सुरु होण्याआधीच संपलेली गोष्ट... अश्या कितीतरी गोष्टी ख-याखु-यापण संपतात सुरु होण्याआधीच... परवा कॉलेजमधुन परत येत होते चालत.. बाजारातल्या दुकानांचे भारी डिस्प्ले बघत डोळे, डोकं आणि २ पाय सगळं एकत्र सुरळीच चालवायचं म्हणजे.. माझंच कौतुक वाटतं मला! एका थोड्या निमुळत्या फुटपाथवरुन न जाणे कोण कसा एक मुलगा समोरुन आला.. (राजबिंडा, हॅण्डसम वगैरे काय काय म्हण्णार होते.. पण खरंच नाही आठवत कसा होता ते) आणि मग बाजुने जात असताना त्याच्या पाठीवरच्या सॅकच्या बंदात माझ्या ओढणीचा गोंडा अडकला... त्याने आणि मी तात्पुरतं मागे बघितलं... ओढणी सोडवायचा अर्धं मिनीट प्रयत्न केला.. ती सुटली आणि मग आम्ही आमच्या आमच्या दिशांना आलो.. तो गेला.. मग खुप वेळानी मला पुन्हा आठवलं ते... हाय देवा, असं काही झालं होतं का?.. किती फिल्मी-विल्मी सिन होता, हायस्पीड मधे कॅमेरा फिरला असता चहुबाजुने... वा-याने माझे केस वगैरे उडले असते... आजुबाजुचं सगळं थांबलं असतं.. मागे छान म्युझिक असतं मंद.. पण मंदपणाच केला देवाने, असं का...