आम्ही सारे आस्तिक
देवावर विश्वास आहे का? हा प्रश्न अनेकदा अनेकांकडून अनेकांना विचारला जातो. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही असं द्यायचो. जसं जसं वय वाढत गेलं तसा तसा देवावरचा विश्वास वाढत गेला. थोरा मोठ्यांना हे सांगितलं की ते म्हणतात बरोबर आहे. जसं जसं वय वाढतं तसं तसं माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. मग काय बरोबर, काय चूक हे कळायला लागतं. मला उलटंच वाटतं. जसजसं वय वाढत गेलं तसतसा माझा स्वतःवरचा विश्वास कमी गेला. आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतोच असं वाटेनासं झालं. पराभव ही एक शक्यता आहे हे जाणवलं आणि मग देवावरचा विश्वासही वाढत गेला. हल्ली देशात देवाचं प्रस्थ भयंकर वाढत चाललंय. मग तो सिद्धिविनायक असो, किंवा साईबाबा असोत किंवा अजून कुठलं देवस्थान. समाज म्हणून आपला आपल्यावरचा विश्वास कमी कमी होत चाललाय की काय?