Posts

Showing posts from August, 2012

जागरण

रात्री १२ नंतर जरा शांत होतं हे शहर.. मग मी ह्या ११व्या मजल्यावरच्या बाल्कनीत बसून मनातला गोंधळ मांडायला लागते ..  मधूनच जाणारी एखादी उशिराची ट्रेन लांबून दिव्यांच्या माळेसारखी दिसत असते.. एका बाजूला सततचा पण जरा कमी झालेला हायवेवरचा ट्रेफिक हळदी-कुंकवाच्या रेघा आखत असतो..मग माझ्या मनातल्या पसरलेल्या शब्दांनाही ओळींमध्ये बसावं लागतं.. खाडीपलीकडच्या शहरातल्या दिव्यांची लखलख अजून चालू असतेच.. पांढरे-लाल-पिवळे-भगवे-निळे.. आणि रिकाम्या जागा भरायला थोडा अधिक काळा रंग.. दिवसभरातल्या माझ्या आठवणीही मग रंग घ्यायला लागतात असे.. काळे-पांढरे-लाल-पिवळे-भगवे-निळे.. समोरच्या एका बिल्डिंगमधेही एक दिवा असाच बराचवेळ  लागलेला दिसतो.. काय करत असेल तो? मांडलेला पसारा आवरत असेल की आवरलेल्या स्वतःला परत पसरत असेल?

भांडण

७:३४ फास्ट मन म्हणत असतं "जमेल असं वाटत नाही" पण पाय ऐकत नाहीत.. जीव खाऊन धावतपळत .. गर्दीतून वाट काढत, धक्काबुक्कीची लाज न बाळगत ट्रेनमध्ये उडी मारते .. एखादी घार टमटमीत उंदराकडे जितक्या जोरात झेप घेत नसेल तितक्या जोरात अर्धाच भाग मावू  शकणाऱ्या फोर्थ सीटवर झेप घेते .. पाय आतून तुटलेले असतात.. ट्रेनचा स्पीड वाढत गेला की त्या सिंकमध्ये श्वासाची गती मंदावत जाते.. दोघंही नॉर्मलला येईतो दुसरं स्टेशन येतंच..  पांढर्याशुभ्र केसांची काडी-कुडी झालेली आज्जी आत चढते...what the hell..मी डोळे मिटून घेते.. टाळ्या वाजवणारे भिकारी टाळायला हाच मार्ग अनेकजण वापरतात.. झोपल्याच सोंग.. कोणीतरी उठेलचं पुढच्या स्टेशनला.. किंवा येईल अजून कोणालातरी पुळका.. ह्या म्हातारीलापण आत्ताच यायचं होतं? कमी गर्दीच्या वेळी जावं की ..  डोळे उघडून बघते.. त्या आज्जीची नजर चुकवत तिच्याकडे बघायचा प्रयत्न करते..मन खात असतं.. पण पायांनी हलायला नकार दिलेला असतो.. मिळालेल्या सीटच्या तुकड्यावरची बैठक घट्ट होत असते..  पाय  म्हणत असतात  "जमेल असं वाटत नाही" पण मन  ऐकत नाहीत..आणि मन "आ...