जागरण

रात्री १२ नंतर जरा शांत होतं हे शहर.. मग मी ह्या ११व्या मजल्यावरच्या बाल्कनीत बसून मनातला गोंधळ मांडायला लागते ..
 मधूनच जाणारी एखादी उशिराची ट्रेन लांबून दिव्यांच्या माळेसारखी दिसत असते.. एका बाजूला सततचा पण जरा कमी झालेला हायवेवरचा ट्रेफिक हळदी-कुंकवाच्या रेघा आखत असतो..मग माझ्या मनातल्या पसरलेल्या शब्दांनाही ओळींमध्ये बसावं लागतं..
खाडीपलीकडच्या शहरातल्या दिव्यांची लखलख अजून चालू असतेच.. पांढरे-लाल-पिवळे-भगवे-निळे.. आणि रिकाम्या जागा भरायला थोडा अधिक काळा रंग..
दिवसभरातल्या माझ्या आठवणीही मग रंग घ्यायला लागतात असे.. काळे-पांढरे-लाल-पिवळे-भगवे-निळे..

समोरच्या एका बिल्डिंगमधेही एक दिवा असाच बराचवेळ  लागलेला दिसतो.. काय करत असेल तो? मांडलेला पसारा आवरत असेल की आवरलेल्या स्वतःला परत पसरत असेल?

Comments

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)