हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हुमुहुमुनुकुनुकूआप्वा हा हवाईचा राज्य-मासा आहे. राज्य-मासा वगैरे प्रकार असतात हे मला आत्ताच कळलं.

" कॅलिफोर्नियाचा राज्य-मासा गोल्डन ट्राऊट आहे. " अवतरणचिन्हातली माहिती उगाच 'मला किनी गुगल वापरता येतं' दाखवायला... महाराष्ट्राचा राज्य-मासा कोणता होऊ शकला असता? बोंबील कदाचित? काय माहित.. कोणताही मासा असला तरी हुमुहुमुनुकुनुकूआप्वा सारखं प्रचंड ऑसम नाव नसेल हे निश्चित!!

ह्या सिरीजला हुमुहुमुनुकुनुकूआप्वा नाव देण्यामागे ह्या  नावाचं ऑस्सम असणं हे पहिलं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण हे कि ही सिरीज नक्की काय आहे हे ठरलेलंच नसल्याने अन्क्लिअर नाव असलेलं बरं!
हे फक्त प्रवासवर्णन नाही किंवा फक्त अनुभवलेखनही नाही. ही हवाईतली दैनंदिनी नाही कि आयटीनीररी गाईडसुद्धा नाही; ह्या सगळ्याच मिश्रण मात्र नक्कीच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे "तू काय विचार करतोयस/ करत्येस?" आहे.

"तू काय विचार करतोयस/करत्येस?" ... तुम्ही आधीचं काही वाचलं नसाल तर थोडक्यात महत्त्वाचं: मला टाईमपास बडबड करायला आवडते आणि अमोलला अर्ध्या-अधिक वेळा काय बोलायचं सुचत नसतं. त्याला बोलतं करायला त्याला प्रश्न विचारत राहाणं मी माझं परमकर्तव्य समजते आणि त्यानी प्रश्न न विचारता "१० मार्कासाठी किमान ४ पानी उत्तर हवं" हे सूत्र लक्षात ठेवून मी माझी माझी मोठी उत्तरं देते. ही सिरीज माझ्या हवाईतल्या आणि हवेतल्या उत्तरांचा 21 अपेक्षित म्हणायला हरकत नसावी. नसावी म्हणजे माझी तरी नाहीये!

हवाई ट्रीप हे माझ्या तिसाव्या वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट होतं. तीस  वर्षं, थर्टी यर्स! एखादा शब्द म्हणून त्याच्यापुढे तोच शब्द इंग्लिशमध्ये आणला कि कसलं वजन येतं ना.. ह्या अश्या ट्रिका-टिपा वापरूनच वजन वाढवायला आम्ही शिकलो असू.

हवाई राज्य हे काही बेटांचा समूह आहे. त्या काही बेटांपैकी आम्ही माउइ आणि कवाईला गेलो होतो. जायच्या आधी मी प्रचंड साशंक होते. मला पोहता येत नाही; आणि एनीवे हवाईला पोहत जाणं पोहायला येणाऱ्या मनुष्यालाही कठीणच जाईल. हवाई म्हणजे वाटर-स्पोर्ट्स हे समीकरण उगाचच मनात बनवून ठेवलं होतं त्यामुळे जरा भीती होती. हवाईला गेल्यावर मात्र ती भीती पार हवेत उडून गेली किंवा पोहून गेली असेल. मला पोहता येत नसलं तर भीतीला पोहता येतं कि नाही ह्यावर माझा अभ्यास नाही.



पुढच्या भागात हवाईमधल्या पहिल्या दिवसाच्या आठवणी! ही पोस्ट अशीच आपली टाईमपास बडबड करायला...

Comments

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

Dating Around (1/n)