जत्रा

आम्ही लहानपणी वरसोलीच्या  जत्रेला दरवर्षी जायचो. विठोबाची जत्रा असते तिथे. संध्याकाळी तयार होऊन बाबा घरी यायची वाट बघत बसायचो... बाबा आले कि ते तयार होईपर्यंत त्यांच्या पुढेपाठी "बाबा मला कानातलं हवयं" "बाबा मला कापूस (म्हातारीचे केस वगैरे म्हणतात त्याला) खायचाय.." म्हणत फिरायचे मी आणि दीपिका नेहेमीप्रमाणे "बाबा मला फुदा" चा हट्ट करत असायची. 

लहानपणापासून मी जबरदस्त भित्री आहे. मी आजवर एकदाही मोठ्या आकाशपाळण्यात बसले नाही आहे. पण लांब उभं राहून फिरणाऱ्या पाळण्याकडे मी कितीतरी वेळ उभी राहायचे... फिरणारे रंग, झगमगते दिवे बघत... लोकांचे, यंत्रांचे आवाज ऐकत... चिकन, चायनीज, मिठाई, पावभाजीचे वास घेत... लोकांचा आनंद, उत्साह अनुभवत... मस्त असायची वरसोलीची जत्रा  किती... 

...

काल आमच्या "काउंटी फेअर" ला नवऱ्यासोबत गेले होते... नवरा काम संपवेपर्यंत मी तयार होऊन घड्याळ बघत बसले होते. त्याचं काम संपवून तो तयार होताना मी त्याच्या मागेपुढे "आपण ना कानातले वगैरे घेऊया.. माझ्याकडे नाहीचेत आता" "yelp वर म्हणतायत कि स्लशी 'must have item' आहे इथला.. आपण घेऊया? आणि कॉटन कॅन्डीपण?" 

फेअरमध्ये मी आणि अमोल बराचवेळ फिरत राहिलो होतो..  'Rides'  बघत उभी असताना अमोल म्हणाला
 "तुला बसायचं आहे का? मी नाही बसत... म्हणजे घाबरत वगैरे नाही हं.. आवडत नाही" 
"मलापण नाही" मी म्हंटलं ... 

आम्ही एकमेकांकडे बघून हसलो आणि शेवटची राईड संपेपर्यंत तिथेच बसून राहिलो ...हवेतला आनंद, उत्साह अनुभवत... चिकन, केक्स आणि बार्बेक्यू चे वास घेत... लोकांचे, यंत्रांचे आवाज ऐकत... फिरणारे रंग आणि झगमगते दिवे बघत... Santa Claraत वरसोलीची जत्रा जगत...

Comments

Vidya Bhutkar said…
:) Made for each other :D

Popular posts from this blog

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

हँलोविन

1 extra second