हँलोविन

मळभ भरलेला उदास दिवस होता तो... वाळूत पायाची बोटं रुतवून मी उभी होते, समुद्राच्या लाटा मोजत!
जिल पाण्यात धावत जात होती. एक क्षणभर तिचा हेवा वाटला खूप.. आपलीही अशी झिरो टाईप फिगर असती तर आपणही मस्त पाण्यात असतो आत्ता..
जिल हातवारे करून काहीतरी दाखवत होती पाण्यातूनच.. "काय? माझ्या बाजूला?" मी माझ्या उजवीकडे वळून पाहिलं.. आणि दचकलेच! कसं शक्य आहे? माझ्या इतक्याजवळ माणूस येऊन उभा राहतो आणि मला कळतही नाही. दोन पावलं मागे सरकत मी त्याच्याकडे नीट पाहिलं. लाईफगार्ड लिहिलेला शर्ट घालून कोणालाही घायाळ करेल इतका भारी दिसणारा माणूस..
"इट्स अ ब्युटीफुल डे .."
मगाशी उदास वगैरे वाटत असेल पण आता हा माणूस म्हणतोय ब्युटीफुल तर नक्कीच ब्युटीफुल...

त्याच्याकडे एकटक बघणं टाळण्यासाठी मी परत लाटा मोजायला लागले.. मधल्या २-३ जाऊन इथे आल्यापासूनची ८६ वी लाट..
"88th.."
"अं? काय?"
"ओह मलाही  लाटा मोजायला आवडतात .. मी इथे आल्यापासूनची ३७६५३२९८८ वी लाट" असं म्हणून तो  खूप मंद हसला..
मी मनातल्या गोष्टीही मोठ्यांनी बोलायला लागल्ये बहुतेक... लक्ष द्यायला हवं.. तो माझा बाजूला उभं राहून समुद्राकडे बघत होता, इतर काही स्मॉल टॉक न करता.. त्याच्याकडे बराचवेळ पाहिल्यावर जाणवलं तो एडवर्ड सारखा दिसतो. twilight मधला... मी मनातल्या मनात जिल ला शिव्या घातल्या.. नको त्या फिल्म्स बघायला लावते. आता मला हा माणूस किचिंत जास्तच आवडायला लागला होता.

तो अधूनमधून माझ्याकडे बघत होता. मी आता चेहऱ्यावर शून्य भाव ठेवून त्याच्याकडे बघायला लागले. त्यालाही मी बेला सारखी वाटले तर.. आणि मग पुन्हा हळूच हसले माझ्या ह्या खटाटोपावर... क्रश लपवण कठीण असतं किती..

"नक्कीच कठीण असतं" तो म्हणाला..
"क्काय?" मी पुन्हा थोडीशी दचकले
"असं न बोलता, कोणाला न भेटता समुद्रकिनारी थांबून राहाणं ... लोकांनी चुका करायची वाट बघत"
"ओह.. "
"अरे, मला वाटतं तुझ्या मैत्रिणीलाच गरज आहे.. " तो पाण्याच्या दिशेने धावत निघाला..
जिल? नाही.. स्विमिंग चाम्प आहे ती.. तिला नाहीये गरज.. पण तोवर ह्या माणसानी त्याचा लाइफगार्ड लिहिलेला शर्ट काढून फेकला होता..
आत्ता सूर्य  ढगाआडून बाहेर यायला हवा.. ह्याचं शरीर चमकेल का मग एडवर्ड सारखं?
अरे देवा.. किती चुकीच्या वेळी किती चुकीचे विचार येऊ शकतात डोक्यात...

तो जिलला हातात घेऊन बाहेर आला.. मी इथे तिचा हेवा करणं टाळत.. धावत गेले तिला बघायला..
" ठीक आहे ती.. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो"
"मीपण येते.. "
"चालेल.. तू फक्त आधी धावत जाऊन लाईफगार्ड पोस्टवर माहिती दे"
तो प्रचंड वेगाने धावत गाडीकडे निघाला..
मी वाळूत पावलं ओढत पोस्टकडे निघाले..

तिथे जाऊन बघते तर.. माझी पावलं वाळूत अधिकच रुतत गेली..
No Lifeguard on duty!

There never was any Lifeguard on Duty!



Comments

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

Dating Around (1/n)