भांडण

७:३४ फास्ट
मन म्हणत असतं "जमेल असं वाटत नाही" पण पाय ऐकत नाहीत..

जीव खाऊन धावतपळत .. गर्दीतून वाट काढत, धक्काबुक्कीची लाज न बाळगत ट्रेनमध्ये उडी मारते .. एखादी घार टमटमीत उंदराकडे जितक्या जोरात झेप घेत नसेल तितक्या जोरात अर्धाच भाग मावू  शकणाऱ्या फोर्थ सीटवर झेप घेते .. पाय आतून तुटलेले असतात.. ट्रेनचा स्पीड वाढत गेला की त्या सिंकमध्ये श्वासाची गती मंदावत जाते.. दोघंही नॉर्मलला येईतो दुसरं स्टेशन येतंच..

 पांढर्याशुभ्र केसांची काडी-कुडी झालेली आज्जी आत चढते...what the hell..मी डोळे मिटून घेते.. टाळ्या वाजवणारे भिकारी टाळायला हाच मार्ग अनेकजण वापरतात.. झोपल्याच सोंग.. कोणीतरी उठेलचं पुढच्या स्टेशनला.. किंवा येईल अजून कोणालातरी पुळका.. ह्या म्हातारीलापण आत्ताच यायचं होतं? कमी गर्दीच्या वेळी जावं की ..  डोळे उघडून बघते.. त्या आज्जीची नजर चुकवत तिच्याकडे बघायचा प्रयत्न करते..मन खात असतं.. पण पायांनी हलायला नकार दिलेला असतो.. मिळालेल्या सीटच्या तुकड्यावरची बैठक घट्ट होत असते.. 

पाय  म्हणत असतात  "जमेल असं वाटत नाही" पण मन  ऐकत नाहीत..आणि मन "आज्जी म्हणावं की काकू" पर्यंत पोचतं..
शेवटी दारात उभे राहून पाय मनाला शिव्या घालत बसतात.. आणि मन आज्जीने डोक्यावरून फिरवलेल्या हातामध्ये खुश होऊन हसत असतं..

हे भांडण हल्ली रोज होत असतं.. समाधान ह्याचं की मन आणि पाय दोघंही एकमेकांना मात्र  हरू देत नाहीत..

Comments

Kya baat hai..
Ekdum manatale bollat. maze pan hech dwand chalat aste manasobat ani nehmi manch jinkate
भोवरा said…
छान लिहिता...
पण खुपच कमी लिहिता...वर्षाला फक्त एकाच ब्लॉग?
अजून लिहा...वाचायला आवडेल

Popular posts from this blog

रबने बनादी जोडी...

हुमुहुमुनुकूनुकूआप्वा - हवाई मेमरीज - १

S.o.B